Stay updated with our latest news, achievements, and media coverage
मांजरवाडी (ता.जुन्नर) : मुरलीधर थोरात यांच्या केळीबागेच्या पाहणीप्रसंगी आखाती देशातील आयातदार आणि शेतकरी.
खोडद, ता. १४ : जुन्नर तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना आखाती देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी (दि.११) भेट दिली. मांजरवाडीसह (ता. जुन्नर)तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाच्या शेतीची सविस्तर माहिती जाणून घेतली.
डेक्कन व्हॅली एफपीसीच्या वतीने सुनील वामन यांनी या पाहणी दौऱ्याचे सादरीकरण केले. यावेळी हस्ताई कोल्ड स्टोरेजचे गणेश वाघ, शेतकरी कैलास कुटे, मांजरवाडी येथील शेतकरी मुरलीधर थोरात यांच्या शेतावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता.
यावेळी आखाती देशातील ताबासोम राहे पायतख्त कंपनीचे आखाती देशातील प्रतिनिधी ताबासोम हेमती, मरियम अहमदी, युशा सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, डेक्कन व्हॅली एफपीसीचे संचालक अजय बेल्हेकर, रवींद्र थोरात, विनायक मुळे, किशोर नेहरकर, संतोष काकडे, चंद्रकांत गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आता केळी या नगदी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. वर्षभर पाणी मिळण्याचे सिंचनाचे स्त्रोत व ठिबक सिंचन, मल्चिंग व काटेकोर शेती नियोजन ही जमेची बाजू असलेला इथला शेतकरी मागील दोन वर्षांपासून निर्यातक्षम केळी उत्पादन करत आहे.
कृषी विभाग, कृषि विज्ञान केंद्र व डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी, सह्याद्री फार्म्स नाशिक, यांच्या माध्यमातून केळी पिकामध्ये एकात्मिक मुल्यसाखळी उभी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रशासन प्रभावी कामगिरी करत आहे.
"कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंटमधून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल निर्यात करून त्याचं अधिकाधिक मूल्य शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा मानस आहे."
"जुन्नर परिसरात एकही औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे येथील हवा व पाणी शुद्ध आहे व येथील शेतकरी हा जैविक निविष्ठांचा वापर प्रभावी करत असल्याने भविष्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील."
नारायणगाव (ता. जुन्नर) : केळी पीक अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकरी.
नारायणगाव, ता. ११ : केळी उत्पादक शेतकऱ्यांची एकत्रित मूल्यसाखळी तयार करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी क्लस्टरची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात एक हजार एकर क्षेत्र निर्यातक्षम केळी लागवडीखाली आणले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ व माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
केळी पिकासाठी एकत्रित मूल्यसाखळी तयार करण्यासाठी या भागात अॅग्रोवनच्या माध्यमातून क्लस्टरची स्थापना करण्यासाठी विविध उपक्रम मागील काही वर्षात हाती घेण्यात आले होते. त्याचा आधार घेऊन डेक्कन व्हॅली या कंपनीचे अध्यक्ष अजय बेल्हेकर यांनी क्लस्टर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अभिनव कृषि फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष मंगेश भास्कर, शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सदस्य शिवाजी कांबळे, डेक्कन व्हॅलीचे संचालक सुनील वामन, योगेश वाळुंज शेतकरी प्रतिनिधी विनायक मुळे असे विविध शेतकरी सहकार्य करत आहे.
शेतकऱ्याला स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वताच्या पायावर उभा करणारा, समृध्दीच्या वाटेवर नेणारा आधुनिक जगाशी जोडणारा हा उपक्रम आहे. यामध्ये कृषी विभाग, आत्मा व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ तांत्रिक बाबीबाबत मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी बाजार मागणीनुसार केळी पीक लागवडीचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे. शेतकऱ्यांना शिवार फेरी, शेती शाळा, प्रशिक्षण, अभ्यासदौरा व छापील साहित्य यांच्या माध्यमातून गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टीसेस बाबतीत सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.
"फळपिकामध्ये राज्यभर त्या त्या भागानिहाय क्लस्टर स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षे, हळद अशा विविध पीकनिहाय क्लस्टर तयार झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थपूर्ण फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच आधार घेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव भागात नाशिकमधील सह्याद्री फार्मच्या हॉर्टिकल्चर इन्क्यूबेशन सेंटर व अॅग्रोवनच्या माध्यमातून केळी पिकांसाठी क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे."